History of Navratri | शारदीय नवरात्री कथा आणि महत्त्व : शारदीय नवरात्री सर्व नवरात्रींपैकी सर्वात लोकप्रिय नवरात्र आहे. या नवरात्री दरम्यान सर्व नऊ दिवस हे देवी शक्तीच्या नऊ रूपांना समर्पित आहेत. म्हणूनच शारदीय नवरात्रीला महा नवरात्री म्हणूनही ओळखले जाते. शारदीय नवरात्री हे नाव शरदऋतू पासून घेतले गेले आहे.
आपल्याकडे सर्वपित्री अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी पासून नवरात्र प्रारंभ होतो, म्हणजेच घटस्थापना होते. नवरात्र हे नऊ दिवस साजरे करतात, पुरुष व स्त्रिया नवरात्रामध्ये नऊ दिवस उपवास तथा देवीचे व्रत करतात. सगळीकडे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते. रोज रात्री गरबा खेळला जातो. पश्चिम बंगालमध्ये तर हा सण खूप जास्त प्रमाणात तथा उत्साहात साजरा केला जातो. पण नवरात्र म्हणजे काय? ते नऊ दिवसच का असते? याबद्दल फारशी कोणाला माहिती नाही. नवरात्र साजरा करण्या मागे दोन गोष्टी कारणीभूत आहेत.
सर्वज्ञात कथा
त्यातील एक कहाणी अशी की, एक राक्षस होता त्याचे नाव महिषासूर होते. त्याला वरदान प्राप्त झाले होते की, तो कुणाही पुढे (अगदी देवदेवता पुढेही) तो पराजित होऊ शकणार नाही. महिषासुराने हे वरदान खूप तपस्या करून मिळवले होते. पण वरदान मिळाल्यावर तो उन्मत्त झाला. त्याने सगळीकडे उन्मात करायला सुरुवात केली. त्याच्या या कृत्यामुळे, सर्व देव- देवता घाबरले. देव- देवता ही त्याचे काहीच वाईट करू शकत नव्हते. ही गोष्ट असह्य झाल्यानंतर देवी दुर्गा माता काली मातेचे रूप धारण करून येईल व त्याचा अंत करेल असे ठरले. त्याप्रमाणेच कालीमाता अवतरली व महिषासुर व काली माता यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले म्हणजेच संग्राम सुरू झाला. तो संग्राम नऊ दिवसांपर्यंत चालला. आणि शेवटी कालीमातेचाच म्हणजे दुर्गे मातेचा विजय झाला. महिषासुराचा अंत झाला तेंव्हापासून दुर्गेचे नवरात्र हे नऊ दिवस साजरे करण्याची प्रथा पडली.
History of Navratri : पौराणिक परंपरा
अगदी पुरातन काळापासूनच दुर्गे मातेला प्रसन्न करण्यासाठी नऊ दिवसाचे नवरात्रीचे व्रत करण्यास सुरुवात झाली असे मानतात. यामागे अजून एक कहाणी देखील आहे. ती अशी की राम राज्याच्या काळात रामाचे आणि रावणाचे युद्ध सुरू झाले. आणि या युद्धात विजय प्राप्त करून घेण्यासाठी प्रभू श्रीरामांनी नऊ दिवस चंडी मातेचे पूजन व आराधना केली. चंडी मातेला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी चंडी मातेची नऊ दिवस खूप भक्ती केली, आणि चंडी माता त्यांना प्रसन्न झाली. रावणाबरोबर नऊ दिवस युद्ध करून दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा अंत केला आणि विजय प्राप्त केला. ते नऊ दिवस म्हणजेच नवरात्राचे नऊ दिवस आणि म्हणूनच अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या या दिवसापासून नवरात्र प्रारंभ होतो, आणि त्या दिवसापासूनच आपण नवरात्र साजरे करतो.
नवरात्र साजरा करण्या मध्ये या दोन्ही कहाण्या खूप महत्त्वाच्या तथा प्रचलित आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिषासुर राक्षस सोबत दुर्गे मातेचे जे युद्ध सुरू होते त्यावेळी अनेक देव-देवता उपस्थित होते. पण कोणीच त्या महिषासुराचे काहीच करू शकले नाही. आणि दुर्गा माता एक नारी असून तिने महिषासुराशी युद्ध करून त्याचा अंत केला. तसेच श्री प्रभू रामचंद्र स्वतः एक पुरुष असूनही त्यांनी नऊ दिवस दुर्गा मातेची आराधना तसेच भक्ती केली. याचाच अर्थ असा आहे की, कुठलीही नारी शक्ती ही देव-देवतांना पेक्षा ही खूप मोठी आहे.
Navratri nine goddess names | नऊ देवींचे नावे अथवा रूपे?
नवरात्रामध्ये दुर्गे माते च्या अनेक वेगवेगळ्या रूपांची आराधना तसेच पूजन केले जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी वेगवेगळी रूपे तिने धारण केली आहेत. रोज वेगवेगळ्या रूपाला वेगवेगळ्या रंगाची वस्त्रे नेसवून दुर्गे मातेची पुजा केली जाते.
नवरात्र दिवस | देवीचे रूप | दिवसाचा रंग |
पहिला | शैलपुत्री | पिवळा – हा रंग आपल्या मनातील नकारात्मक विचारांना दुर करून सकारात्मकताप्रधान करतो. |
दुसरा | ब्रह्मचारीणी | हिरवा – हा रंग समृदधीचे तसेच भरभराटीचे प्रतीक मानले जाते. |
तिसरा | चंद्रघंटा | राखाडी – हा रंग आपल्याला गौरव आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देत असतो |
चौथा | कुष्मांडा | नारंगी – आनंद आणि उर्जा या दोघांची सुचना देणारा रंग आहे. |
पाचवा | स्कंदमाता | पांढरा – हा शुदधता आणि पावित्र्याचे प्रतीक. |
सहावा | कात्यायनी | लाल – रंग हा मनातील उत्साह दर्शवण्याचे काम करत असतो. शिवाय आपल्या आयुष्याला उर्जा प्रदान करत असतो. |
सातवा | काली | निळा – हा रंग दृढ विश्वासाचे प्रतीक मानला जातो. तसेच आपल्याला अंतर्ज्ञान मिळवण्यास देखील मदतगार ठरतो. |
आठवा | महागौरी | गुलाबी – रंग हा सार्वभौमिक प्रेमाचे आणि स्नेहाचे प्रतिक आहे. |
नववा | सिद्धिदात्री | जांभळा – हा रंग राजेशाही थाटामाटाचा तसेच अंतर्मनाच्या स्थिरतेचे प्रतीक म्हणुन ओळखला जातो. |
9 Navratri mantra jaap | नवरात्रींचे ९ जाप
- शैलपुत्री: ह्रीं शिवायै नम:।
- ब्रह्मचारिणी: ह्रीं श्री अम्बिकायै नम:।
- चन्द्रघण्टा: ऐं श्रीं शक्तयै नम:।
- कूष्मांडा: ऐं ह्री देव्यै नम:।
- स्कंदमाता: ह्रीं क्लीं स्वमिन्यै नम:।
- कात्यायनी: क्लीं श्री त्रिनेत्रायै नम:।
- कालरात्रि: क्लीं ऐं श्री कालिकायै नम:।
- महागौरी: श्री क्लीं ह्रीं वरदायै नम:।
- सिद्धिदात्री: ह्रीं क्लीं ऐं सिद्धये नम:।
Diwali Faral & Diwali Faral Recipes in Marathi | दिवाळी फराळ पाककृतीसह
In Conclusion :
History of Navratri : या वर्षी ७ ऑक्टोबर पासून “शारदीय नवरात्र चालू होत आहे. गेल्या २ वर्षापासून संपूर्ण जगावरच “कोरोना/CORONA” चे संकट ओढवलेले आहे. यातून नुकतेच आता आपण सावरत आहोत. देवीच्या या ९ रुपात देवीने जे अलौकिक साहस आणि कर्तुत्व करून संपूर्ण स्त्रीलाच जागृत केले आहे. तू कमजोर नाहीस, उठ जागी हो आणि तुझ्यातील दिव्य शक्तींना ओळख. त्याच ओळखींची ही देवीची नऊ रूपे आहेत.
हा माझा लेख जर तुम्हांला आवडला असेल तर आपल्या आप्तेष्ट, मित्रपरिवार आणि इतरांशी शेअर जरूर करा.
जय माता दी||