Home Blog Diwali Faral & Diwali Faral Recipes in Marathi | दिवाळी फराळ पाककृतीसह

Diwali Faral & Diwali Faral Recipes in Marathi | दिवाळी फराळ पाककृतीसह

- Advertisement -

Diwali Faral & Diwali Faral Recipes in Marathi“दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा”. दिवाळी हा संपूर्ण वर्षातील आनंददायी सण. ज्याला सर्व सणांचा शिरोमणी म्हणता येईल असा खास सण. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आपुलकीच्या गोड नात्यात बांधून ठेवणारा महत्वाचा सण. अश्या उत्साही वातावरणात सगळे जण फटाके फोडण्याचा आनंद लुटतात. दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा महत्वाचा दुवा म्हणजे दिवाळी फराळ. घराघरांतून दिवाळीची खरी रंगत वाढते ती फराळामुळेच. म्हणूनच जर फराळाला दिवाळीचा आत्मा म्हटले तर वावगे ठरणार नाही. दिवाळीच्या जल्लोषासाठी प्रत्येक भारतीय घरात फराळ तयार होतो.  दिवाळीच्या आठ दिवस अगोदरपासूनच प्रत्येक गृहिणी फराळाच्या जय्यत तयारीसाठी सज्ज होते. त्यामुळे दिवाळीपूर्व काळात घराघरांतून दरवळणाऱ्या वेगवेगळ्या फराळाच्या सुगंधानेच मंत्रमुग्ध झाल्यासारखे होते. दिवाळी सणाची चाहूल आपल्याला लागते ती फराळाच्या या तयारीमुळेच. दिवाळी हा सण फराळाशिवाय अपूर्ण आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत Diwali Faral यासाठी बनवलेले पहिले पदार्थ हे प्रथम घरातील कुल-दैवतांना अर्पण करून मगच वापरण्याची प्रथा आहे.

दिवाळीचा पौराणिक संदर्भ…

दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीता सह अयोद्धया परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोद्धयावासियांनी रोषणाई व दीपक लावून मोठ्या आनंदात तो दिवस साजरा केला होता. दिवाळी भारतातील प्राचीन आणि सर्वात प्रसिद्ध सणांमधील एक आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्व दिले आहे.

Diwali Faral खरंच आपली संस्कृती आहे का ?

आपल्या भारतातील महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, राजस्थान अशा विविध प्रांतागणिक दिवाळी फराळाचे पदार्थ आणि त्यांची नावे बदलत जातात. पण फराळाशिवाय दिवाळी कुठेही साजरी होत नाही. महाराष्ट्रीय फराळात चकली, लाडू, शेव, करंजी, शंकरपाळी, चिवडा, अनारसे या पदार्थांमुळे दिवाळीची लज्जत खऱ्या अर्थाने द्विगुणित होते. मराठी फराळात समाविष्ट झालेले कितीतरी पदार्थ मुळात आपले नसून विविध प्रांतातून आपल्याकडे आले आणि महाराष्ट्रात रुळले.

आज ज्याला लाडू या नावाने आपण संबोधतो त्याचे मूळ हिंदी लड्डूत आढळते आणि नावाच्या या अपभ्रंशामुळे लाडू अन्य प्रांतातून आपल्याकडे आला. लाडवाप्रमाणे अन्य प्रांतातून आपल्याकडे आलेला आणि आपलाच वाटावा इतका परिचित झालेला अन्य पदार्थ म्हणजे चकली. चकुली, चकरी, मुरुक्कू या नावाने ओळखली जाणारी ही चकली दक्षिण भारतातून आपल्याकडे आली. प्राचीन काळापासून करंजी शष्कुली या नावाने परिचित होती. करंजीचं मूळ उत्तरप्रदेशात दिसून येतं. उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र असा प्रवास करत ती मराठी घरात आली असावी. प्रत्येक प्रांतात तिचं नाव बदललेलं दिसतं. उत्तरप्रदेशात करंजीला गुजिया म्हणतात. छत्तीसगडमध्ये तिला कुसली, बिहारमध्ये पुरुकीया किंवा पेडकीया तसेच गुजरातमध्ये तिला घुघरा असे म्हणतात. जशी मराठी घरात होळीला पुरणाची पोळीचा नैवेद्य असतो तशी उत्तर भारतात होळीच्या सणाला गुजिया प्रत्येक घरात बनवली जाते. तसेच अनारशांचे कुळ शोधताना ते बिहारकडे अधिक झुकलेलं दिसतं. कारण बिहारमध्ये तिथल्या अस्सल बिहारी पदार्थात अनारशांना महत्त्वाचं स्थान आहे.

Diwali Faral : मराठी खाद्यसंस्कृतीचा ठेवा 

सगळे दिवाळी फराळातील पदार्थ अस्सल मराठी आहेत याची खात्री नसली तरी गेली कित्येक वर्षे हे सर्व पदार्थ आपल्या फराळाच्या ताटाची शोभा वाढवत आहेत. फराळेचे हे पदार्थ आपल्या मातीतील असो किंवा नको पण दिवाळी सण साजरा करण्यात आपला आनंद द्विगुणित करतात. म्हणूनच फराळ हा मराठी खाद्यसंस्कृतीचा ठेवा आहे.

"<yoastmark

Diwali Faral Online : ऑनलाइन घरगुती फराळाला प्रचंड मागणी का आहे?

२५-३० वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील बहुतांश मध्यमवर्गीय गृहिणी दिवाळी फराळाचे सर्व पदार्थ घरीच बनवत असत. पण आताचे महिला विश्व त्यामानाने खूप प्रगत आणि फास्टफॉरवर्ड झाले आहे.  हल्ली बहुतांश मध्यमवर्गीय महिला गृहिणी नोकरी आणि घर अशी तारेवरची कसरत करताना दिसत आहेत. त्यामुळे नोकरी व्यवसायाच्या व्यापामुळे आणि वेळेअभावी हल्ली रेडिमेड फराळ आणणं सोयीचं ठरायला लागलं आहे. त्यामुळे कोणतीही मेहनत न करता घरगुती पद्धतीने केलेला फराळ अगदी वाजवी दरात बाजारात उपलब्ध आहे. तोही ऑनलाईन पद्धतीने मागवता येतो. म्हणून घरगुती फराळाला प्रचंड मागणी आहे.

आपल्या माहितीसाठी ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येणाऱ्या फराळाच्या पदार्थांचे अंदाजे दर दर्शित करणारी एक जाहिरात दिली आहे. घरगुती फराळाला प्रचंड मागणी असल्यामुळे हल्ली बऱ्याच महिला फराळ बनवण्याच्या व्यवसायात उतरल्या आहेत. शिवाय चकली, चिवड्यासारखे पदार्थ लोकांना प्रिय असल्यामुळे पूर्ण वर्षभर विकले जातात.

Diwali Faral याचे उद्दिष्ट काय ?

दिवाळी फराळ हि आपली भारतीय परंपरा मानली जाते. दिवाळी फराळाचे उद्दिष्ट भारताच्या कृषिप्रधानतेशी जोडलेले आहे. शेतीच्या दिवसांत कष्ट करून दमलेल्या शेतकऱ्यांसाठी निवांत होण्याचा काळ म्हणजे दिवाळीचा काळ. या काळात गोडधोड, तेलकट, तुपकट पदार्थ खाऊन शरीराचे कोडकौतुक पुरवले जाते. आणि थंडीत शरीरात स्निग्धता साठवून घेतली जाते. या उद्दिष्टाने दिवाळीचे निमित्त साधून फराळाची परंपरा निर्माण झाली.

तसेच दिवाळीच्या सुमारास वातावरणात थंडपणा येऊ लागतो. तसेच शरीरातील चयापचयावर विशिष्ट परिणाम जाणवू लागतो. ज्या वेळी पचनशक्ती मध्यम स्वरूपाची असते त्या वेळेस अग्नी चांगल्या प्रकारे प्रदीप्त असतो व खाल्लेल्या पदार्थांचे व्यवस्थित पचन होऊन त्याचे प्राकृत धातूंमध्ये रूपांतर होत असते. म्हणूनच आश्विन व कार्तिकात दसरा, दिवाळी या सणांना भरपूर गोड व दुग्धयुक्त पदार्थ खाण्याची प्रथा पडली असावी.

Diwali Faral शरीराला उपयुक्त कसा आहे ?

दिवाळीमध्ये लाडू, करंजी, शंकरपाळी, अनारसा, चिरोटे अशी गोड तर चिवडा, चकली, शेव अशी खमंग पदार्थांची रेलचेल असते. फराळाच्या प्रत्येक पदार्थाचे विशिष्ट गुणधर्म असतात ज्याचे परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. पूर्वीच्या काळी मुगाच्या डाळीपासून बुंदीचे लाडू तयार करायचे. या बुंदीचे लाडू योग्य प्रमाणात खाल्ल्यास पचावयास हलके, त्रिदोषनाशक, रुचिकर व नेत्रांना हितकर असतात. करंजीही स्निग्ध असून पचावयास जड असते. त्याचप्रमाणे शीघ्र बल देणारी असते. शंकरपाळे वीर्यवर्धक असून, बलवर्धक आहे. खार्‍या शंकरपाळ्यांमध्ये जिरे असल्याने ते बलदायक होतात. शिवाय ज्या लोकांना भूक लागत नाही त्यांना हा पदार्थ उपयुक्त ठरतो. अनारस्यामध्ये असणार्‍या खसखशीमुळे ते अग्निवर्धक व कृमीरोगास नाहीसा करणारा आहे. डाळीच्या पिठाची चकली पुष्टिकर, मधुर व रुचकर असते. तर तांदळाच्या पिठाची चकली शीघ्र बलदायक, वात पित्तशामक असते. चिवड्यामध्ये हिंग, खोबरे, शेंगदाणे, तीळ, हळदीचा वापर भरपूर प्रमाणात करतात. हळद व हिंग पाचक असून भूक वाढवणारे आहेत. तसेच खोबरे, शेंगदाणे व तीळ स्निग्ध व बलदायक आहेत. म्हणून गोड पदार्थांसोबत चिवड्यासारखे खमंग पदार्थ खाल्ल्यास पचनास मदत होते.

काय आहे Diwali Faral ची ऐतिहासिक कहाणी ?

११ व्या शतकातील “भोजनकुतूहल” या ग्रंथात फराळाचा उल्लेख येतो. यावरून या परंपरेचा इतिहास किती मोठा आहे याची कल्पना येते. उपनिषद काळापासून वेगवेगळ्या रूपात हा फराळ सिद्ध होतो. अश्या या दीर्घ परंपरेतून महाराष्ट्रातील घराघरांतून बनवल्या जाणाऱ्या फराळाकडे आपण पाहतो तेंव्हा मराठी प्रांतात हे पदार्थ कधी, कुठून आणि कसे आले याची उत्सुकता लागून राहते. आणि हाती येणारी माहिती थक्क करून टाकते.

प्रत्येक प्रांताची अशी एक विशेष खाद्यपरंपरा – खाद्यसंस्कृती असते. आणि हा समृद्ध वारसा प्रत्येक प्रांत जपत असतो. फक्त पदार्थांची नावे उच्चारल्यावर देखील निगडित असलेला प्रांत आपल्या डोळ्यासमोर येतो. रसगुल्ला म्हटले कि बंगाल आणि खाकरा म्हटले कि गुजरात आपोआप डोळ्यासमोर येतो. तसेच मोदक किंवा पुरणपोळी हि आपल्या महाराष्ट्राची खासियत आहे.

Diwali Faral बनवताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात ?

चमचमणारे कंदील, पणत्या, रांगोळ्या, नवीन कपडे तसेच फराळ हेच खरे दिवाळीचे आकर्षण. आजकाल चकली, चिवडा, लाडू हे पदार्थ बाराही महिने दुकानांमध्ये उपलब्ध असतात. पण दिवाळीत हे फराळाचे पदार्थ आवर्जून घराघरांतून बनवले जातात. हे पदार्थ बनवताना काही चुका सर्रास केल्या जातात ज्या आरोग्याला घातक असतात त्या कटाक्षाने टाळाव्यात.

 1. चकली, चिवडा करताना वर्तमानपत्राचा वापर टाळा. चकल्या तळून वर्तमानपत्रावर काढू नका. कारण वर्तमानपत्राच्या शाईमध्ये आरोग्याला घातक असणारे घटक असतात. ते चकल्यांमध्ये शोषल्यास आणि शरीरात गेल्यास त्रासदायक ठरू शकते. वर्तमानपत्राऐवजी टिश्यू पेपरचा वापर करा.
 2. शेव किंवा चकली तळल्यामुळे त्यामध्ये तेल शोषले जाते. त्याऐवजी बेक्ड शेव आणि बेक्ड चकलीचा पर्याय निवडावा.
 3. करंज्यांसाठी मैद्याऐवजी मल्टी ग्रेन पिठाचा वापर करा जेणेकरून करंजी जास्त पौष्टीक होईल.
 4. शंकरपाळी करताना साखरेऐवजी गुळाचा वापर करा. त्यामुळे चवही चांगली येईल. तसेच चिवड्यामध्ये खूप तेल, खोबरं आणि शेंगदाणे घालणे टाळा. त्याऐवजी भाजलेल्या सुक्या मेव्याचा वापर करा.

Diwali Faral List : मराठी दिवाळी फराळाच्या पंगतीत बसणारे पदार्थ कोणते ?

 1. चकली
 2. चिवडा
 3. लाडू
 4. करंजी
 5. शंकरपाळे
 6. अनारसे
 7. शेव  
 8. तिखट पुरी  
 9. चिरोटे
 10. नानकटाई

Diwali Faral Recipes in Marathi : दिवाळी फराळाची पाककृती… 

 • भाजणीची खुसखुशीत चकली

चकली भाजणीचं पीठ : ४ वाट्या बासमती तांदूळ, १ वाटी उडीद डाळ, १ वाटी चणा डाळ, १ वाटी मूग डाळ, १/२ वाटी साबुदाणा, १ वाटी पोहे, ३ टेबल स्पून धने, २ टेबल स्पून ओवा, २ टेबल स्पून जिरे.

 1. तांदूळ धुवून उन्हात सुकवावे. दळण देण्यापूर्वी तांदूळ तसेच इतर सर्व पदार्थ व्यवस्थित भाजून घ्यावेत. आणि त्याचे पीठ बनवून आणावे.

साहित्य :

 • १ १/२ किलो भाजणीचे पीठ, २ टेबल स्पून लाल तिखट, २ टेबल स्पून सफेद तीळ, आणि चवीप्रमाणे मीठ

कृती :

 1. एका परातीत दीड किलो भाजणीचे पीठ घ्यावे.
 2. त्याचवेळी गॅसवर कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवावे.
 3. भाजणीच्या पिठात लाल तिखट, तीळ तसेच चवीप्रमाणे मीठ टाकावे.
 4. चकली खुसखुशीत होण्यासाठी आपण ३-४ टेबल स्पून गरम तेल पिठात टाकावे.
 5. आवश्यक तेवढे पाणी टाकून चपातीला मळतो तसे पण थोडे घट्ट पीठ मळून घ्यावे.
 6. नंतर चकलीच्या साच्याला आतून थोडे पाणी लावून पिठाचा छोटा गोळा साच्यात टाकावा आणि फॉईल पेपरचे छोटे छोटे ७-८ तुकडे करून त्यावर चकल्या पाडाव्यात जेणेकरून तळण्याकरिता त्या कढईत टाकणे सोपे होईल.
 7. कढईतील तेल चांगले गरम झाल्यावर मध्यम आचेवर चकल्या छानपैकी तळून टिशू पेपरवर काढाव्यात.
 8. छान खुसखुशीत भाजणीच्या कुरकुरीत आणि स्वादिष्ट चकल्या तयार.
 • चिवडा

 •  साहित्य :

१/२ किलो पातळ पोहे, १ वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, १ वाटी शेंगदाणे, १ वाटी भाजलेली चणा डाळ, १/२ वाटी काजूचे तुकडे, ६-७ कापलेल्या हिरव्या मिरच्या, तेल ६ मोठे चमचे, बारीक कापलेले लसूण, कडीपत्ता, पिठी साखर १ चमचा, मोहरी, हळद आणि चवीनुसार मीठ.

 • कृती :
 1. गॅसवर एक कढई ठेवा आणि त्यात पातळ पोहे मंद आचेवर ५-७ मिनिटे भाजून घ्या.
 2. पोहे भाजताना हळुवारपणे हलवा नाहीतर ते तुटू शकतात.
 3. पोहे भाजून झाल्यावर एका मोठ्या परातीत काढून घ्या.
 4. तसेच चणा डाळ सुद्धा भाजून घ्या.
 5. नंतर त्याच कढईमध्ये ६ मोठे चमचे तेल गरम करून घ्या.
 6. तेल गरम झाल्यावर त्यात काजूचे तुकडे टाकून सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर तळून घ्या.
 7. खरपूस तळलेले काजूचे काप बाहेर काढून घ्या. आणि ते आपण भाजलेल्या पोह्यावर घालावे.
 8. नंतर त्या तेलात सुक्या खोबऱ्याचे काप घालून मंद आचेवर खरपूस भाजून घ्या. आणि ते सुद्धा भाजलेल्या पोह्यांवर घालावेत.
 9. त्या तेलात नंतर शेंगदाणे घालून खरपूस होईपर्यंत तळून घ्यावेत आणि भाजलेल्या पोह्यांवर घालावेत.
 10. याच तेलामध्ये १ चमचा मोहरी घाला.
 11. मोहरी तडतडल्यावर यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालावा तसेच बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता घाला. हे सर्व आपण खरपूस होईपर्यंत भाजून घ्यावे.
 12. हे सर्व भाजून झाल्यावर गॅस बंद करा आणि त्यामध्ये १ चमचा हळद घाला. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या.
 13. हि फोडणी पोह्यांवर घाला. यामध्ये भाजलेली चणा डाळ, पिठी साखर आणि मीठ घालून हळुवारपणे संपूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यावे. मिश्रण मिक्स करताना पोहे तुटणार नाही याची काळजी घ्यावी.
 14. या सर्व मिश्रणाला सुरेख रंग येतो झाला आपला चिवडा तयार. हा चिवडा खूप दिवस टिकतो.
 • लाडू

Diwali Faral यात “सम्राट” हा किताब फक्त लाडूलाच मिळू शकतो.  कारण तो एखाद्या राजबिंड्या सम्राटाप्रमाणे आपल्या पंचेंद्रियांवर राज्य करीत असतो. मग ते लाडवाचा देखणेपण असो किंवा स्वर्गीय चवीचा याचा गोडवा असो. दात नसलेल्या ८० वर्षीय आजीपासून ते दात पडलेल्या ८ वर्षाच्या नातीपर्यंत सर्वांचा आवडीचा पदार्थ म्हणजे लाडू. दिवाळीसाठी प्रत्येक घरात रवा लाडू आणि बेसन लाडू आवडीने बनवले जातात.

१. रवा लाडू

 • साहित्य :

२ वाटी बारीक रवा, १ १/२ वाटी पिठी साखर, १ वाटी तूप, १/२ चमचा वेलची व जायफळ पूड, आवडीप्रमाणे काजू, मनुके आणि चारोळी, १ चमचा दूध

 • कृती :
 1. सर्वप्रथम रवा निवडून घ्यावा.
 2. जाड बुडाच्या पसरट कढईत २ चमचे तुपावर हा रवा खमंग भाजून घ्या. मंद आचेवर रवा भाजताना सतत हलवत रहा.
 3. रवा खाली लागणार नाही याची खास काळजी घ्या. रव्याचा खमंग सुवास सुटेपर्यंत रवा भाजून घ्यावा. रव्याचा रंग बदलू देऊ नका. रवा लाल झाला तर लाडूही लाल होतील.
 4. वरून यात थोडे थोडे तूप घालत रहा. रव्याचा रंग हलका गुलाबी झाला कि गॅस बंद करून रवा परातीत काढून घ्या.
 5. मग साजूक तुपावर काजू मनुके, चारोळी हा सुका मेवा तळून घ्या.
 6. तळलेला हा सुका मेवा रव्यात मिसळा.
 7. वरून यात जायफळ व वेलची पूडही घाला.
 8. नंतर या रव्यात पिठी साखर घाला. आणि हे मिश्रण पलित्याने छान एकजीव करून घ्या.
 9. यानंतर पुन्हा २ चमचे तूप तापवायला ठेवा. आणि आपण तयार केलेले रव्याचे मिश्रण पुन्हा एकदा भाजून घ्या.
 10. साखर वितळून लाडू वळले जावेत यासाठी फक्त आपण दोन मिनिटे हे मिश्रण भाजायचे आहे.
 11. रव्याचा हाताला चटका लागला कि लगेच गॅस बंद करा.
 12. आणि १ चमचा दुधाचा हबका या मिश्रणावर मारा. दुधाचे प्रमाण जास्त झाले तर हे मिश्रण खूप ओलसर होईल आणि लाडू जास्त दिवस टिकणार नाहीत. म्हणून रव्यावर फक्त १ चमचा दुधाचाच हबका मारा.
 13. आणि त्यावर झाकण मारून ५ मिनिटे हे मिश्रण मुरू द्या ५ मिनिटे मुरल्यानंतर हे मिश्रण छान मिसळून घ्या.
 14. त्यानंतर या मिश्रणाचे लाडू वळायला सुरुवात करा.
 15. अश्याप्रकारे सर्व लाडू वळून घ्या.    

 २. बेसन लाडू

 • साहित्य :

२ कप बेसन, १ कप रवा, २ १/२ कप पिठी साखर, २ चमचे वेलची पूड, ५० ग्राम डिंक, आवडीप्रमाणे मनुके आणि काजू, १ १/२ कप साजूक तूप, १/४ कप दूध

 • कृती :
 1. सर्वप्रथम जाड बुडाच्या कढईत आपण घेतलेल्या प्रमाणाच्या अर्धे तूप घाला.
 2. वरून यात बेसन घालून, यात रवा घाला.
 3. आता मंद आचेवर हे बेसन भाजत रहा. बेसन भाजताना हळूहळू तूपही सोडा. हे बेसन असेच भाजत रहा.
 4. शक्यतो बेसनच्या लाडूसाठी लागणारे बेसन घरी बनवलेलं असावे. म्हणजेच चण्याची डाळ भाजून त्याची भरड वाटलेले बेसन असावे.
 5. साधारणपणे १० मिनिटाने भाजत असलेल्या बेसनाचा सुगंध सुटेल. आणि बेसनाचा रंगही बदलेल. बेसन कधीही मंद आचेवरच भाजावे. नाहीतर ते करपण्याची शक्यता असते.
 6. कमीत कमी ४५ ते ५० मिनिटे बेसन मंद आचेवर चांगले भाजून घ्या.
 7. आता जेंव्हा बेसन तूप सोडायला सुरुवात करेल तेंव्हा समजा कि बेसन चांगले भाजले आहे. नंतर गॅस बंद करा.
 8. यानंतर फोडणी पात्रात २ चमचे साजूक तूप तापवा.
 9. तापलेल्या तुपात डिंक फुलवून घ्या. डिंकामुळे लाडवांना एक वेगळी चव लागते आणि खुसखुशीतपणा येतो.
 10. आता फुलवलेले डिंक खलबत्त्यात कुटून घ्या. यानंतर एका परातीत भाजलेले बेसन काढून घ्या.
 11. यात पिठी साखर घालून वरतून मनुके आणि काजू घाला.
 12. सर्वात शेवटी वेलची पूड घाला. आता हे मिश्रण छान एकजीव करायला सुरुवात करा.
 13. त्यावर वरतून यात डिंकाचा चुरा घाला.
 14. यानंतर बेसनावर दुधाचा हबका मारा. आता हे मिश्रण छान एकजीव करा.
 15. पिठी साखर शक्यतो चाळून घ्या म्हणजे त्यात गुठळ्या राहणार नाहीत. हलक्या हाताने हे मिश्रण कणिक मळल्याप्रमाणे एकजीव करा. ५ मिनिटात हे मिश्रण छान जमून येईल.
 16. आता लाडू वळायला सुरुवात करा.
 17. अश्याप्रकारे सर्व बेसनचे लाडू वळून घ्या.           
 • करंजी

दिवाळीच्या फराळात सर्वांत मानाची असते ती करंजी. पोटात गोडवा आणि ओठांवर फक्त नक्षी. असे वर्णन केले जाते करंजीचे. पूर्वीच्या काळी सुगरणीची पारख केली जायची ती तिच्या करंजीवरून. जिच्या फराळातील करंजी सुंदर आणि नक्षीदार आणि ओठांनी खावी अशी असायची तिलाच सुगरणीचे मानाचे स्थान प्राप्त व्हायचे.

 • करंजीचे सारण :

१ वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, अर्धी वाटी रवा, पाव कप खसखस, पाव कप सफेद तीळ, आवडीप्रमाणे मनुके आणि चारोळी, १ १/२ चमचा वेलची पूड, २ कप पिठी साखर, २ चमचे साजूक तूप, चिमूटभर मीठ.

 1. एका कढईत खोबऱ्याचा किस ३-४ मिनिटे भाजून घ्या. खोबरे करपणार नाही याची काळजी घ्या.
 2. भाजलेले खोबरे एका परातीत काढून घ्या. आता त्याच कढईत २ चमचे साजूक तूप घाला.
 3. या तुपावर रवा भाजून घ्या. दोन मिनिटे रवा भाजून परातीत काढून घ्या. रवा जास्त लाल होऊ देऊ नका.
 4. यानंतर खसखसही अश्याप्रकारे भाजून घ्या. भाजलेली खसखस काढून घ्या.
 5. नंतर मनुके व बेदाणे गरम करून घ्या. आणि परातीत काढा.
 6. सर्वात शेवटी तीळ भाजून घ्या. तीळ भाजताना झाकण ठेवा नाहीतर तीळ भाजताना तडतडून बाहेर उडतात. साधारणपणे १ मिनिट तीळ भाजून परातीत काढून घ्या.
 7. आता परातीत काढलेल्या भाजणीवर पिठी साखर घाला. वरून वेलची पूड घाला. चिमूटभर मीठ घाला.
 8. हाताने हे सारण छान एकजीव करून घ्या. पिठी साखर सारणात घालण्यापूर्वी चाळून घ्यावी म्हणजे ती सारणात छान एकजीव होते.
 9. अश्याप्रकारे करंज्यांचे सारण तयार करावे.

 

१. खुसखुशीत साठ्याची करंजी

 • साहित्य :

करंजीचे सारण, १ कप मैदा, १ कप साजूक तूप, १ कप कोमट दूध, १/२ कप कॉर्नफ्लॉवर, चिमूटभर मीठ, आणि तळण्यासाठी तूप किंवा तेल.

 • कृती :
 1. सर्वप्रथम मैदा चाळून घ्या. मग त्यात चिमूटभर मीठ घाला.
 2. आता फोडणी पात्रात तूप तापवायला ठेवा. तूप चांगले तापले कि हे कडकडीत मोहन पिठात घाला. चमच्याने छान एकजीव करा.
 3. थोडे थोडे दूध टाकून हे पीठ मळून घ्या. करंजीचे पीठ घट्टसर असावे.
 4. आता सुक्या कपड्याखाली १५ ते २० मिनिटासाठी हे पीठ झाकून ठेवा.
 5. यादरम्यान एका प्लेटमध्ये कॉर्नफ्लॉवर घ्या आणि त्यात तूप घालून फेसून घ्या.
 6. हा तयार झाला आपला साठा.
 7. १५ मिनिटांनी पिठाचे समान ४ भाग करा. आणि याच्या ४ मोठ्या चपात्या लाटून घ्या.
 8. यानंतर एका चपातीवर साठा लावून घ्या. त्यावर दुसरी चपाती ठेवा.
 9. या दुसऱ्या चपातीवर तुपाचा हात फिरवा आणि साठा लावून घ्या.
 10. अश्याप्रकारे उरलेल्या दोन्ही चपात्याही बनवून घ्या. आता साठा लावलेल्या चपात्यांची सुरळीप्रमाणे घडी करा.
 11. याचे समान तुकडे करून घ्या. असे केल्याने करंजीला छान पापुद्रे सुटतील. आता करंजी लाटायला सुरुवात करा.
 12. पातळ लाटून झाल्यावर लाटलेल्या करंजीत सारण घाला. आणि किनाऱ्यावर बोटाने पाणी लावून करंजीचे तोंड दाबून बंद करा.
 13. सर्वात शेवटी करंजी कापणीने कापून घ्या.  अश्याप्रकारे सर्व करंज्या बनवून एका सुती कपड्याखाली झाकून ठेवा.
 14. यानंतर जाड बुडाच्या कढईत तापलेल्या तेलात एक एक करंजी हळुवारपणे सोडून, मध्यम आचेवर हि करंजी तळून घ्या.
 15. करंजी तळण्यासाठी नेहमी तेल मध्यम तापलेले असावे. छान सोनेरी रंगावर सर्व करंज्या तळून घ्या.

 

शंकरपाळे

 • साहित्य :

१ वाटी पिठी साखर, १ वाटी दूध, १ वाटी वितळवलेले साजूक तूप किंवा तेल, अर्धा चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा मीठ, ४ वाट्या मैदा, तळण्यासाठी तूप किंवा तेल.

 • कृती :
 1. सर्वप्रथम एक स्टीलचे भांडे गॅसवर गरम होण्यास ठेवावे. भांडे गरम झाल्यावर त्यात दूध घालावे.
 2. आपल्याला दुध फक्त कोमट करून घ्यायचे आहे. दुधात साखर टाकून विरघळून घ्यावी.
 3. साखर वितळेपर्यंत दूध ढवळत राहावे. साखर वितळल्यावर दूध बाजूला करून ठेवावे आणि पीठ भिजवून घ्यावे.
 4. सुरुवातीला २ वाट्या मैदा घ्यावा. त्यानंतर आपण पिठामध्ये मीठ आणि वेलची पूड टाकून छान मिक्स करून घ्यावे.
 5. नंतर त्यात गरम तूप घालून त्यात मैदा सोडा व हे मिश्रण छान एकजीव करून घ्यावा.
 6. आता उरलेला २ वाट्या मैदा हळूहळू त्यात टाकून पीठ मळून घ्यावे. हे मिश्रण आपण एका परातीत काढावे जेणे करून आपल्याला ते नीट मळता येईल.
 7. नंतर या पिठात साखर वितळवलेले दूध हळू हळू घालून पीठ नीट मळून घावे.
 8. मळलेले पीठ १५ मिनिटे झाकून ठेवावे.
 9. त्यानंतर पीठ पुन्हा एकदा एकसारखे करून घावे. आणि छोटे छोटे गोळे करावेत. जेणेकरून त्याची पोळी लाटून शंकरपाळ्या करता येतील.
 10. शंकरपाळ्याची पोळी थोडी जाडसरच ठेऊन, पोळी चारही बाजूंनी कापून घ्यावी.
 11. शेवटी चौकोनी आकारात शंकरपाळे कापून घ्यावे.
 12. कढईतील तेल छान गरम झाल्यावर त्यात शंकरपाळ्या सोडाव्यात. तळताना गॅस मंद ठेवावा.
 13. मंद आचेवर सर्व शंकरपाळ्या खरपूस तळून घ्याव्यात.

अनारसे

 • साहित्य :

५०० ग्राम तांदूळ (जुने), ५०० ग्राम गूळ, मिक्स करण्यासाठी आणि तळण्यासाठी तूप, खसखस.

तांदूळ भिजवण्याची कृती :
 1. सर्वप्रथम तांदूळ निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. हे तांदूळ पाण्यामध्ये ३ दिवस भिजत ठेवावेत.
 2. रोज सकाळ संध्याकाळ त्यातील पाणी बदलावे. नाहीतर तांदळाला खूप वास येतो. तिसऱ्या दिवशी तांदूळ पाण्यातून काढून एका सुती कपड्यावर काढून पंख्याखाली सुकत ठेवावे.
 3. अनारशांसाठी कधीही नवीन तांदूळ घेऊ नका. शक्यतो जुनेच तांदूळ वापरावेत.
 4. पटनी किंवा कोलम तांदूळ कधीही चांगलेच.
 5. चौथ्या दिवशी तांदूळ सुकले असतील तर ग्राइंडर मध्ये ते दळून घ्या. तांदूळ सुकवताना ते पूर्णपणे कोरडे करू नयेत. त्यात थोडा दमटपणा असावा कारण या दमटपणामुळेच ते व्यवस्थित दळले जातात.
 6. अनारशांमध्ये आपण बिलकुल पाणी टाकत नाही. तांदूळ दळल्यानंतर चांगले चाळून घ्यावेत. चाळल्यावर चाळणीत राहिलेली कणी पुन्हा दळून आणि चाळून घ्यावी.
 7. अश्याप्रकारे सर्व तांदूळ दळून घ्यावेत. तांदळाच्या पिठात नंतर गुळ घालावा. त्यासाठी गूळ किसणीवर किसून घ्यावा किंवा त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत.
 8. एका मोठ्या परातीत किसलेला गूळ आणि पीठ घ्यावे. त्यात ४ मोठे चमचे तूप घालावे.
 9. अनारशांचे पीठ मळताना पाणी घालायचे नाही. थोड्या ओलसरपणासाठी हवे त्यात एक केळे कापून टाकावे किंवा थोडे दही घालावे.
अनारसे प्रत्यक्ष बनवण्याची भिजवण्याची कृती :
 1. हे मिश्रण एकत्र मळून घ्यावे. अनारसे हे दिवाळी फराळातील (Diwali Faral) रेसिपीमध्ये हा भाग सर्वात कठीण आणि कष्टदायक असतो. पहिला गोळा मळणे म्हणजे खरी कसोटी लागते. कारण यात पाण्याचा वापर करायचा नसतो. पाणी लागले तर पीठ खराब होते. पीठ आणि गूळ एकजीव झालं कि याचे चेंडूप्रमाणे गोळे बनवून एका डब्यात ठेवावेत.
 2. पिठाचे गोळे डब्यात ठेवल्यावर त्यावर एक केळे ठेवावे. आणि डबा बंद करावा. केळ्याच्या उष्णतेमुळे पिठातील गूळ वितळतो. त्यामुळं नंतर पीठ मळणे सोपे जाते.
 3. तीन दिवस हे पीठ डब्यात तसेच गोळे करून ठेवावे. पण प्रत्येक दिवशी गोळे काढून पुन्हा मळून डब्यात ठेवावे.
 4. तिसऱ्या दिवशी केळे काढून टाकावे कारण केळ्याची साल काळी पडते. चौथ्या दिवशी गोळे काढून खलबत्त्यात कुटून घ्यावे.  त्यामुळे पीठ मऊ होते. पीठ कुटून झाल्यावर एका परातीत काढून घ्यावे आणि गूळ आणि पीठ छान मळून घ्यावे.
 5. या पिठाचे पुन्हा गोळे बनवून २-३ दिवसांसाठी डब्यात बंद करून ठेवावेत.
 6. नंतर ६ व्या दिवशी पीठ व्यवस्थित तयार होते. हे गोळे पुन्हा परातीत काढून छान मळून घ्यावेत.
 7. यानंतरच अनारसे बनवायला सुरवात करावी.
 8. या पिठाचे लिंबाएवढे छोटे गोळे करावेत. एका वाटीत खसखस घ्यावी. त्यात एक गोळा बुडवा.
 9. एका बटर पेपर किंवा प्लास्टिक पेपरवर तूप लावून घ्यावे जेणे करून अनारसे चिकटणार नाही. त्यावर गोळा ठेवताना खसखस लावलेला भाग वर ठेवावा.
 10. त्या गोळ्याला हाताच्या बोटांनी पुरीसारखा आकार द्या. जास्त पातळ करू नका किंवा जास्त जाडही ठेऊ नका.
 11. अनारसे हलक्या हाताने वळून घ्या. आणि अनारसे तुपात किंवा तेलात तळून घ्या. अथवा अर्धे तूप आणि अर्धे तेल सुद्धा घेऊ शकता.
 12. मंद आचेवर अनारसे तळून घ्या. गुळाचे प्रमाण बरोबर असेल तर अनारस्यांना छान जाळी पडते.
 13. अनारसे तेलातील बाजूने थोडे ब्राउन झाला कि तो एका कालथ्यावर काढून घ्या आणि दुसऱ्या कालथ्याने त्यावर तूप सोडा.
 14. कारण अनारसे तळताना कधीही पलटी करत नाहीत. नाहीतर त्याचा रंग काळपट होतो.
 15. कलथ्याने गरम तूप सोडल्यामुळे अनारसा छान तळलाही जातो आणि त्याचा रंगही सुंदर येतो.
 16. अश्याप्रकारे सर्व अनारसे तळून घ्यावेत.
 17. अनारसे बनवणे हि प्रत्येक गृहिणींसाठी खरंच एक सत्वपरीक्षाच असते.

तिखट शेव   

 • साहित्य :

२ कप चण्याचे पीठ, तेल, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा ओवा, मीठ चवीप्रमाणे.

 • कृती :
 1. सर्वप्रथम एका कढईत तेल तापवण्यास ठेवावे.
 2. एका परातीत दोन कप बेसन घ्यावे.
 3. त्यात पाव कप गरम तेल घालावे.
 4. १/२ चमचा लाल तिखट आणि १/४ चमचा हळदी पावडर घालावी. पाव चमचा ओवा घालावा. तसेच चवीनुसार मीठ घालावे.
 5. हे मिश्रण प्रथम व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. नंतर या पिठात थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे.
 6. हे पीठ चपातीपेक्षा थोडे नरम मळावे. पीठ व्यवस्थित मळून झाल्यावर शेवयाचा साचा आणि चकती घ्यावी.
 7. त्यात पिठाचा एक गोळा भरून, झाकण लावून तेलाच्या कढईत शेवया पाडाव्यात.
 8. शेवया तळताना गॅस मंद असावा. शेवया सोनेरी लालसर रंग येईपर्यंत तळाव्यात.
 9. अश्याप्रकारे सर्व शेवया तळून घ्याव्या. शेवयांच्या दोन प्रकारच्या चकत्या असतात.
 10. जाड शेव आणि बारीक शेव.
 11. याच पिठाच्या आपण दोन्ही प्रकारच्या शेवया बनवू शकतो.

तिखट पुरी

 • साहित्य :

अर्धा किलो मैदा, २ चमचे सांबर मसाला, कोथिंबीर आवडीनुसार, २ चमचे सफेद तीळ, २ चमचे कसुरी मेथी, २ चमचे मिरी पूड, दोन छोट्या वाट्या तेल, २ चमचे आले लसूण पेस्ट, २ चमचे मीठ, दोन छोट्या वाट्या लाल तिखट, तळलेला कडीपत्ता आवडीनुसार

 • कृती :
 1. सर्वप्रथम दोन वाट्या तेल गरम करायला ठेवावे.
 2. मैदा एका परातीत काढून घ्यावा. त्यात आपण घेतलेले साहित्य एक एक करून मिसळावे.
 3. कोथिंबीर, तीळ, मिरीपूड, आले लसूण पेस्ट, कसुरी मेथी, सांबर मसाला, लाल तिखट, मीठ तसेच तळलेला कडीपत्ता हे सर्व जिन्नस पिठात मिक्स करून घ्यावे.
 4. या मिश्रणात दोन वाट्या गरम केलेले तेल ओतावे.
 5. हे पीठ चपातीच्या पिठासारखे मळून घ्यावे. आणि त्याला तेल लावून अर्धा तास झाकून ठेवावे.
 6. त्यानंतर पुऱ्या करायला घ्याव्यात. चपातीएवढा गोळा घेऊन लाटी जेवढी पातळ लाटता येईल तेवढी लाटावी.
 7. पुऱ्या करायला घेण्यापूर्वी तळण्यासाठी मंद आचेवर तेल तापवत ठेवावे.
 8. वाटीच्या साहाय्याने गोल पुऱ्या पाडून घ्याव्यात. तेल चांगले तापल्यावर पुऱ्या तळून घ्याव्यात.
 9. पुऱ्या मंद आचेवर तळाल्या तरच त्या खमंग भाजल्या जातात. मोठ्या गॅसवर तळल्या तर त्या मऊ पडतात.
 10. सर्व पुऱ्या तळून थंड झाल्यावर लगेच बंद डब्यात ठेवाव्यात.

चिरोटे

 •  साहित्य :

२५० ग्राम मैदा, २ टेबलस्पून पातळ तूप, ४ टेबलस्पून बारीक रवा, २०० मिली दूध, चिमूटभर मीठ, आणि साखर पावडर.

 • कृती :
 1. एका परातीत मैदा, रवा आणि मीठ घेऊन छान मिक्स करून घ्यावे.
 2. त्यावर तुपाचे कडकडीत मोहन घालून एका चमच्याने मिक्स करून घ्यावे.
 3. या मिश्रणात थोडे थोडे दूध घालून पीठ मळून घ्यावे. हे पीठ मळून झाल्यावर अर्धा तास झाकून ठेवावे.
 4. नंतर कॉर्नफ्लॉवरचा साठा तयार करावा. एका वाटीत २ टेबलस्पून तूप घ्यावे त्यात २ टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर मिसळून छान फेटून घ्यावे.
 5. यानंतर झाकून ठेवलेल्या पिठाचे समान ६ गोळे करून घ्यावे.
 6. यातील तीन गोळे घेऊन तीन पोळ्या लाटून घ्याव्यात. एक पोळी पोळपाटावर ठेऊन साठा लावून घ्यावा.
 7. या साठ्यावर अजून एक पोळी टाकून साठा लावून घ्यावा. याचप्रकारे तिसऱ्या पोळीवरही साठा व्यवस्थित लावून घ्यावा.
 8. या तिन्ही पोळ्यांचा एका बाजूने सुरुवात करून घट्ट रोल करून घ्यावा जेणेकरून यात कुठेही हवा राहणार नाही. आणि चिरोट्यांच्या पाकळ्याही छान येतील.
 9. एका चाकूने रोलच्या दोन्ही बाजू काढून टाका. आणि मग अर्ध्या अर्ध्या इंचाचे गोळे करून घ्यावेत.
 10. हे गोळे एका प्लेटमध्ये काढून घ्यावेत. आणि त्यातील एक गोळा पोळपाटावर घेऊन लेयर्स असणारी बाजू वर ठेऊन लाटून घ्यावा.
 11. या चिरोट्याला खूप सुंदर लेयर्स येतात.
 12. चिरोटा जास्त पातळ लाटू नये. थोडा जाडसर लाटावा.
 13. त्यानंतर चिरोटे तळण्यास घ्यावेत. तेल चांगले गरम करून घ्यावे. आणि मंद आचेवर चिरोटे तळून घ्यावेत.
 14. आणि झाऱ्याने गरम तेल चिरोट्यांवर सोडत रहा.
 15. मंद आचेवर तळल्यामुळे हे चिरोटे छान खुसखुशीत होतात.
 16. तळताना चिरोट्यांना हलका गुलाबी रंग आला कि चिरोटे एका टिशू पेपरवर काढून घ्यावेत.
 17. एका गाळणीत साखर पावडर घेऊन सर्व चिरोट्यांवर शिंपडल्याप्रमाणे पेरावी.
 18. साखरेचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो.
 19. हे चिरोटे खारीसारखे खुसखुशीत होतात. अश्याप्रकारे सर्व चिरोटे बनवून घ्या.

नानकटाई 

नानकटाईचा जन्म झाला १६ व्या शतकात गुजरातच्या सुरत येथील एका डच बेकरीमध्ये. तेंव्हापासून नानकटाईने सकाळच्या नाश्त्यापासून ते दिवाळीच्या फराळामध्ये सुद्धा स्थान मिळवले.

 • साहित्य :

२ कप मैदा, १ कप डालडा, १ कप पिठी साखर, २ टेबलस्पून बेसन, पाव टीस्पून बेकिंग पावडर, चारोळ्या

 • कृती :
 1. सर्वप्रथम एका परातीत डालडा हाताने चांगला फेटून घ्या. डालडा चांगला फेटल्यामुळे नानकटाई हलकी होते.
 2. फेटलेल्या डालड्यात पिठी साखर घालून पुन्हा नीट फेटावे जेणेकरून साखर डालड्यात वितळेल.
 3. साखर डालड्यात छान मिक्स झाली कि त्यात चाळणीच्या साहाय्याने मैदा, बेसन आणि बेकिंग पावडर घालावी.
 4. नंतर हे पीठ छान मळून घ्यावे.
 5. या मळलेल्या पिठाचे पेढ्याच्या आकाराचे गोळे बनवावेत. त्यावर चारोळ्या लावाव्यात.
 6. एका गोलाकार बेकिंग ट्रेला आतून तूप लावून घ्यावे. बेकिंग ट्रेमध्ये बिस्किटे गॅप सोडून लावावीत. कारण बेक केल्यावर ती फुलतात आणि जवळ लावली तर एकमेकांना चिकटतात.
 7. एका वेळेला बेकिंग ट्रे मध्ये आपण ६-७ बिस्किटे बेक करू शकतो.
 8. एक कढई मोठ्या गॅसवर ५ मिनिटे चांगली तापवून घ्यावी.
 9. त्या कढईत एक जाळी ठेवावी. त्या जाळीवर बेकिंग ट्रे ठेवावा. आणि कढईवर झाकण ठेवावे. सुरुवातीला ५ मिनिटे गॅस मोठा ठेवावा. आणि नंतर १५ मिनिटे हि बिस्किटे मंद आचेवर बेक करावी. १५ मिनिटे झाल्यावर गॅस बंद करावा. ५ मिनिटानंतर कढईवरील झाकण काढावे.
 10. त्यातून बिस्किटे काढून प्लेटमध्ये काढून घ्यावी. हि बिस्किटे कढईत छान बेक होतात.
 11. त्यासाठी आपल्याला ओव्हनची किंवा बेकरीत जायची गरज नाही.
 12. अश्याप्रकारे सर्व बिस्किटे बेक करून घ्यावी.

In Conclusion :

सणांमध्ये दिवाळी साजरी करता आली नाही तर वर्षातील सर्वच दिवस त्याची रुखरुख लागून राहते. म्हणून दिवाळी साजरी झालीच पाहिजे आणि तीही दिवाळीच्या सर्व चटकदार पदार्थांसह तरच दिवाळी.

Diwali Faral लेखिका : सौ. ऋतुजा तिर्लोटकर 

"<yoastmark

 

 

 

 

 

 

https://www.mastersfinancejobs.com/

Digilocker द्वारे SSC आणि HSCचे eMarksheet कसे डाउनलोड करावे?

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.
- Advertisment -

Most Popular

college reopen | अखेर महाविद्यालये सुरू झाली…

Maharashtra college reopen : "बागेत फुले आणि महाविद्यालयात मुले नसतील तर दोन्हीही ठिकाणे बेरंगीच! गेल्या १८ महिन्यांपासून covid-19 च्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने "लॉकडाऊन" लावला...

what is beat reporting / बीट रिपोर्टिंग म्हणजे काय?

what is beat reporting / बीट रिपोर्टिंग म्हणजे काय? बीट रिपोर्टिंग, यालाच विशेष अहवाल/रिपोर्ट म्हणूनही ओळखले जाते. हा पत्रकारितेचा एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे. जो एका...

Recent Comments

Related eBooks